नाटिका - बोंबा मारी शेंबडं
_____________________
दृश्य :-(हेंब्याचे बाबा त्याला काही काम सांगत आहेत.)
वडील:- हेंब्या, आरे ऐ हेंब्या
(हेंब्या काहीच बोलत नाही. स्वतःशीच धुंद.)
वडील:- आरे ऐ हेंब्या ss
हेंब्या:- (दचकून) काय बापू...
वडील:- आरं, तुले ढोरं घेऊन जायचं की नाही? चल आटप लवकर.
हेंब्या:- हो बापू जातो की...
धई ss हो ss... हाल्या हो ss...कमळ्या हो ss
हेंब्या:- कारे गोट्या,कसा आहेस दोस्ता.
गोट्या:- आपण त नेहमीच बेस असतो.तू कुठ चालला आता ढोरं घेऊन.
हेंब्या:-मी चाललो भुलविच्या रानाकडं.
गोट्या:- जा बाबा,पण जरा जपून जा.
(डोक्यावर ऊन येतं. वर बघतो,पण तसाच ढोरं वळत असतो. चक्कर येऊन खाली पडतो.तोंड मातीत खूपसलेले.तसाच पडून असतो.)
आई:- संध्याकाळ झाली आता माव्हा हेंबू येईल. त्याच्यासाठी मी आज,त्याच्या आवडीची कळण्याची भाकर केली.
(बाहेर वाकून सतत वाट पाहते.)
आई:-देवा, अजून कसं आलं नाही माव्ह पोरगं. रात झाली आता .धनी ,आहो धनी, आहो जा की बघा ना. आपला हेंबू अजून आला नाही.
वडिल:- बरं,जातो की..
(काठी,कंदील,बॅटरी घेऊन जातो)
वडिल:- का रे गोट्या, तू आन हेंब्या बरोबर गेले होते ना ढोराकडं.अजून हेंब्या कसा आला नाही.
गोट्या:- हो काका,आम्ही गेलतो बरोबर. पण मंग दुपारी, तो ढोरं घेऊन,त्या भूलवीच्या रानाकडं गेला होता.
वडिल:- काय ?भूलवीच्या रानाकडं. (कपाळावर हात मारतो.)अरे देवा! वाचव माह्या पोराला.
आरे,चला रे चला, हेंब्याले धुंडायले.
गावकरी १:- हेंब्याss आरे ऐ हेंब्या ss हेंब्या रे ss..
गावकरी २ :- हेंब्या रेss , ऐ हेंब्या ss
गावकरी ३:-हेंब्या हेंब्या हेंब्या,हेंब्या रे ssss
गोट्या:- (जोराने बोंबलतो) लवकर इकडं या. ह्यो हेंब्या.
वडिल:- (रडक्या स्वरात) आरे उचला माव्ह्या पोराला. काय झालं त्याला?काहून मुका हाये?आरे कोणी त्याच्या तोंडावर पाणी शिंपा.
(गावकरी ३ हेंब्याच्या तोंडावर पाणी शिंपडतो. हेंब्या चित्रविचित्र आवाज काढतो.)
हेंब्या:- ती sss ती sss आली.
(हेंब्या पुन्हा पुन्हा चित्रविचित्र आवाज काढतो.)
गोट्या:- आरे त्याले भूतानं धरलं वाटते?
सर्व गावकरी:- हो हो त्याले भुतानच धरले.
गावकरी १:- याले घरी घ्या. भगताकडं नेऊ. मस्तपैकी कोंबडं बकरं कापू...
गावकरी २:- हो हो आता कोंबडं बकरंच कापू.
गावकरी ३:- चला लवकर,आटपा.
(हेंब्याला घरी घेऊन येतात.)
आई:- (टाहो फोडून) देवा ss आरे देवा ss काय झालं माह्या सोन्याले... वाचव त्याले..
गोट्या:- काकी, त्याले भूतानं धरलं.
आई:- आरे देवा रे ss.. (मोठ्याने रडत बसते.)
शाहीर:- आरारारारा....तर मंडळी,बघा आता. हेंब्याला भुतानं धरलं म्हणतात. आणि आता कोंबडं बकरं कापायची तयारी सुरू आहे.
""""""""""""""""""""""""""""""""""
बोंबा मारी शेंबडं रं, बोंबा मारी शेंबडं रं
धरलं याला, (कोरस- कोन्ह ?)
धरलं याला,भूतानं रं ,कापू आता कोंबडं //ध्रु//
कसा गडबडा लोळ (कोरस- आहों)
काही खात नाही पीतं (कोरस- आहों)
काही बोल नाही खेळ (कोरस- आहों)
धरलं असल,(कोरस- कोन्ह ?)
धरलं असल,(कोरस- कोन्ह ?)
धरलं असल,भूतानं रं कापू आता कोंबडं॥१॥
ओवाळून लिंबू भात (कोरस- आहो)
घालू भूताला साकडं (कोरस- आहो)
आ रं..नेऊ त्याला भगताकडं(कोरस-आहो)
भगत:- काय झालं ss
गावकरी २ :- बाबा याला भूतानं धरलं
भगत:- हुं ss (हाताची मूठ वळून इकडे तिकडे पाहतो व डोळे लाऊन फुक मारतो.)
आता कोंबडं बकरं कापाव लागेल. दोन हजाराची कोरी करकरीत नोट लागल...
(मंत्र म्हणतो) ओम भगभूगे भगनी भागोदरी भगमासे ओम फट स्वाहा... हा..
ओम..र्र्हीम क्लिम... भगबुगे..भगनी भागोदरी..भगमासे..भौमी ..भू.. ओम फट् स्वाहा !! हा...(जोराने हसतो)हा.. हा..हा..हा
जा.. तुव्ह पोरगं नीट होईल..
गीत - ओवाळून लिंबू भात (कोरस- आहो)
घालू भूताला साकडं (कोरस- आहो)
आ रं..नेऊ त्याला भगताकडं(कोरस-आहो)
उतरू त्याचं भूत रं,कापू आता कोंबड॥२॥
""""""""""""""""""""""""""""""""""
महिला१ :- बाबा पोरीच्या लग्नाला ४-५ वर्षे झाली काही मुलबाळ होत नाही.
महाराज :- हं.. (हाताचे कांडे मोजत) सोम्मार, गुरवार, शुकीरवार, शनवार उपास धर. बाबाला १ तोळे सोनं दे. मंग तुह्या पोरीच्या पोटी,सोन्या जन्माले येईल.
महिला २ :- बाबा, हे माव्ह पोरगं पासच होतं नाही. काही तरी उपाय सांगा.
महाराज :- हंss, पोराले म्हणा दररोज सकाळ संध्याकाळ टि. व्ही. पाहायची, मोबाईल खेळायचा. महाराजाले दररोज १ नारळ द्यायचं. जाय.. तुव्ह पोरगं नक्की पास होईल.
महिला ३:- बाबा मला नवऱ्यानं टाकलं हो ss (रडत बसते..)
महाराज - हं ss.. बाई तू १६ सोम्माराचं व्रत कर. बाबाला १ किलो चांदी अर्पण कर. मंग सर्वकाही ठीक होईल..
महिला ४ :- महाराज.. माव्हा नवरा मले, दारू पिऊन रोज मारते हो... (रडत रडत) काही तरी उपाय सांगा.
महाराज :- हं... आसं का?
तू एक गाय महाराजाले दे. आन, तू पण बेलनं घेऊन नवऱ्याले ठोकून काढ. मंग पाह्य नवरा कसा सरळ होते.
हिला पोर नाही होतं (कोरस- आहो)
पोरग पास नाही होतं(कोरस- आहो)
हिला नवऱ्यानं टाकलं हो(कोरस- आहो)
हिला नवऱ्यानं मारलं (कोरस- आहो)
बाबा अंतरज्ञानी फार (कोरस- आहो)
देई प्रश्नांची उत्तरं (कोरस- आहो)
बाबा करल (कोरस -काय?)
बाबा करल (कोरस -काय?)
बाबा करल उपचार
जावू आपण बाबाकडं //३//
"""""""""""""""""""""""""""""""""""
अरे डॉक्टर आला ( कोरस-आहो)
(डॉक्टर येऊन कॉमेडी पद्धतीने तपासणी करतो. हेम्ब्याचे अधून मधून चित्रविचित्र आवाज काढणे सुरूच असते.)
अरे डॉक्टर आला ( कोरस-आहो)
म्हणे नाही भूत याला
आहे मनाचाच रोग
आपण करू उपचार
धरलं नाही(कोरस- कोन्ह ?)
धरलं नाही (कोरस- कोन्ह ?)
धरलं नाही भुतान रं-कापू नका कोंबडं//४//
शिक्षक: आरे हे काय सूरू आहे. बंद करा हे सगळं. असे नवसाने कुठं मूलं होतात का? त्यासाठी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागतो. आज जग किती पुढे गेले आहे. कोणतीही गोष्ट अशक्य राहली नाही.
आणि पोरगं काय देवाले नारळ फोडून पास होते का? त्यासाठी अभ्यास करावा लागतो.
आणि जर कुणावर अत्याचार होत असेल तर कायदेशीर सल्ला घ्यावा. थांबवा हे अघोरी प्रकार आणि हेंब्याला डॉक्टरकडे घेऊन जा.
डॉक्टर:- याला भूतानं वगैरे धरलेलं नाही. हा मानसिक रुग्ण दिसतो. त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. तिथे चांगला इलाज होईल. घाबरू नका. काही होणार नाही. सर्वकाही ठिक होईल.
शाहीर :-
तुझ्या भोवताली बघ - शोध प्रश्नांची उत्तरं विज्ञान नाही अवघड या उत्तरात दडं
धरलं नाही (कोरस- कोन्ह ?)
धरलं नाही (कोरस- कोन्ह ?)
धरलं नाही भुतानं रं- कापू नका कोंबडं
धरलं नाही भुतानं रं- कापू नका कोंबडं
धरलं नाही भुतानं रं- कापू नका कोंबडं॥५॥
समाप्त
*******************************
लेखक-साहेबराव दौलतराव अंभोरे(विषय शिक्षक)
(एम.ए. ,बि.एड.,एम.एड., सेट ,इतिहास)
मो. 8379985589,9403198489
______________________________
No comments:
Post a Comment